।।श्री।।
१ मार्च २०१५
"जूनं ते सोनं" ह्या विचारांपासून आता आपण "क्विकर (QUIKR)" किंवा "OLX" च्या जगात, जेथे "जूनं ते विकणं" ह्या संस्कृतीपर्यंत पोहोचलो आहोत. तर अशा ह्या जगात ५० वर्षांचे सहजीवन म्हणजे खचितच कौतुकास्पद व समारंभास पात्र आहे.
१६ फेब्रुवारी १९६५ - ह्या दिवशी कुर्ल्यातील ब्राह्मण सेवा संघाच्या मंगल कार्यालयात आंजर्ल्यातील एक तरुणी व साखरप्याहून, पोटातील भूकेने मुंबई गाठलेला एक तरुण यांचे शुभमंगल झाले. त्या दिवसाला आता ५० वर्षे होऊन गेली आिण तोच सोहळा साजरा करायला आपण सारे आप्तेष्ट आज जमलो आहोत. तुमच्या आजच्या उपस्थितीबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार !!
अक्षता पडल्यावर घुमणारा "सावधान" चा गजर, खरोखरच पुढच्या काळातील येणा-या खडतरतेचा सूचक होता, हे कदाचित त्यावेळी, त्या जोडप्यास ठाऊक नव्हते.
संसाराची सुरुवात करण्यासाठी अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा. पण ह्या तीनही आघाड्यांवर ह्या नवपरिणीतांची बोंबच होती. ह्यांच्या संसाराची सुरुवात शेळ्या बांधण्याच्या गोठ्यापासून झाली. उंच्यापु-या नवरदेवाला शर्ट घालताना हात लांब करण्या इतपतही घराची लांबी, रुंदी व उंची नसल्यामुळे, घराबाहेर येऊनच त्याला शर्ट घालावा लागत असे. स्वयंपाकाची भांडी दोरीवर झुलणा-या एका फळकुटावर विराजमान होती. लवकरच ते, मोठ्या जागेत म्हणजे १०० स्क्वेअर फुटाच्या चाळीतील घरात रहावयास गेले. तुमच्यापैकी जवळ जवळ सर्वच त्या घराचे साक्षीदार आहात.
दिवस हळूहळू सरत होते. परंतु १९८२ चा गिरणी संपाचा काळ आठवला की आजही अंगावर काटा येतो. घरची परिस्थिती कायमच यथातथा, गाठीशी बचत शून्य, खाणारी तोंडं चार, त्यातील दोन मुले खाजगी शाळेत शिकणारी, घरासाठी घेतलेल्या लोनच्या हप्त्याचा तगादा आणि सहा महिन्यांपर्यंत घरात पैशाची आवक शून्य. पण ह्या सर्वाची झळ आई-दादांनी आमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. आम्ही एकही दिवस उपाशी झोपलो
नाही किंवा एकही महिना शाळेची फी चुकविली नाही. खरच, कसं निभावून नेलं असेल त्या काळात आमच्या आई-दादांनी, हे त्यांचं त्यांनाच ठाऊक.
एक प्रसंग मात्र आमच्या मनात कायमचं घर करुन गेला, तो म्हणजे घराचे हप्ते फेडण्यासाठी आईने तिचा, एकदाही न वापरलेला सोन्याचा हार दादांच्या हाती, त्यांच्या इच्छेविरुद्ध विकण्यासाठी सुपूर्त केला. त्यावेळच्या आई-दादांच्या ओलावलेल्या पापण्या आज त्यांना अखंड सोन्याने मढविले तरी आम्ही विसरु शकणार नाही.
त्या कठीण काळात कांदिवली येथील शेजा-यांची मदत व तुम्हां सर्व नातेवाईकांची सोबत फार मोलाची होती. अनेक मदतींच्या हातांपैकी प्रकर्षाने व नेहमीच हक्काचे हात पुढे आले, ते होते, चेंबुरच्या बाबाकाका-काकूचे (हो चेंबुरच्याच !!), लिलाआत्या-चंदुकाका व मामा-मामी ह्यांचे.
असो !! ते दिवसही सरले. एकेकाळी मुंबईत स्वत:ची १ स्क्वेअर फुट जागा नसताना, आज आई-दादा स्वत:च्या हक्काच्या घरात मुलां-नातवंडासोबत समाधानाने आयुष्य उपभोगत आहेत. आई-दादांनी आमच्या लग्नानंतर त्यांच्या नातवंडांवरही तितकेच, किंबहुना त्याहून अधिकच प्रेम केले व त्यांना मोठे केले. त्यामुळेच आम्ही आमच्या नोकरीत लक्ष केंद्रीत करु शकलो.
लग्न-लग्न म्हणजे तरी काय हो? ज्याप्रमाणे नदी सागराला मिळताना स्वत:चे अस्तित्व विसरुन सागरात सामावून जाते, त्याप्रमाणे पती-पत्नींनी स्वत:चं अस्तित्व विसरुन संसाररुपी सागरात सामावून जाणे. आमच्या आई-दादांनीही स्वत:चे अस्तित्व, आवडी-निवडी विसरुन ब-याच तडजोडी केल्या. सर्व नातेवाईकांशी, सग्यासोय-यांशी संबंध ठेवणे व घर चालवणे ही जबाबदारी आईने सांभाळली, तर दादांनी अहोरात्र कष्ट करुन संसाराला मिळविता हात दिला. दादांचा धाक आणि शिस्त व आईचे प्रेम आणि कष्ट ह्याचे फळ आम्हाला मिळत आहे.
तरी, त्यांच्या ह्या लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी दिनी त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना !!!!